वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

जलचक्र - गदिमा

नदी सागरा मिळते
पुन्हा येईना बाहेर
जग म्हणते कसे गं,
नाही नदीला माहेर.

काय सांगावे बापानो
तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराला जाते
म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी आठवतो तिला
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी उडोनीया जाते
पंख वाऱ्याचे घेऊन

उन्ह पुन्हा हो लेकरू
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा

शेअर करा ...